उन्हाळ्यात डोळ्यांच्या संसर्गात वाढ; काळजी घेण्याचे आवाहन   

पुणे : शहरात डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः कंजंक्टिव्हायटिसच्या (अश्रुपात) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदा उष्ण आणि दमट हवामानामुळे संसर्गाचा प्रसार अधिक वेगाने आणि तीव्र स्वरूपात होत आहे. आजार केवळ डोळ्यांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर वेळेत लक्ष न दिल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात, असे एशियन आय हॉस्पिटलच्या संस्थापक संचालिका व नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रुतिका जुनगडे कांकरीया यांनी सांगितले.
 
डॉ. कांकरीया म्हणाले, या संसर्गामागे अ‍ॅडेनोव्हायरस या विषाणूचा मुख्य सहभाग आहे. सेरोटाइप ८, १९ आणि ३७ या प्रकारांचे विषाणू यंदा अधिक प्रभावी असून, ते डोळ्यांमध्ये झिल्ली तयार होणे, सूज, आणि तीव्र वेदना यासारखी तीव्र लक्षणे निर्माण करतात. याव्यतिरिक्त डोळ्यांतील चिकट स्त्राव, पाण्याचा सतत ओघ आणि पापण्यांमध्ये जळजळ अशी लक्षणे सर्वसामान्य रुग्णांमध्येही दिसून येत आहेत. आजार उद्भवल्यास वेळेवर उपचार घेतले गेले, तर गंभीर परिणाम टाळता येतात. 
 
कंजंक्टिव्हायटिसची योग्य वेळी काळजी घेतली नाही तर डोळ्यांच्या आतील झिल्लीवर कायमस्वरूपी इजा होऊ शकते. अशा रुग्णांमध्ये पुढे जाऊन अश्रूंचा प्रवाह बाधित होतो, डोळ्यांमध्ये कोरडेपणा निर्माण होतो, आणि काही वेळा दृष्टीवर परिणाम करणारे पांढरे डागही राहतात. वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर वापरणे, डोळ्यांना हात लावणे टाळणे, संसर्ग झालेल्या व्यक्तींनी गॉगल्सचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, अशा रुग्णांनी सामाजिक कार्यक्रम टाळावेत आणि स्विमिंग पूलच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्ला डॉ. कांकरीया यांनी यावेळी दिला.
 
कंजंक्टिव्हायटिस हा आजार छोटा वाटू शकतो, पण तो वेळेवर निदान व उपचार न झाल्यास गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणूनच कोणतेही लक्षण दिसताच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
 

Related Articles